Sanstha Logo
श्री बनेश्वर शिक्षण संस्था, बनसारोळा

मुख्यपृष्ठशाळा › होळेश्वर विद्यालय

📚

श्री होळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, होळ

Shree Holeshwar Secondary and Higher Secondary School, Hol

श्री बनेश्वर शिक्षण संस्था, बनसारोळा संचलित · ता. केज जि. बीड

📅 स्थापना 1963 📍 होळ, केज तालुका, बीड 🏠 वसतीगृह (साने गुरुजी वसतीगृह) 🛣️ NH 548D महामार्ग 📐 1 हेक्टर 26 आर परिसर 👩‍🏫 16 कार्यरत शिक्षक

श्री बनेश्वर शिक्षण संस्था, बनसारोळाचे तत्कालीन संस्थापक कै. पू. नारायणराव रामराव काळदाते (दादा) यांनी केज तालुक्यातील होळ तसेच त्या परिसरातील इतर खेडेगावातील विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्यासाठी होत असलेली हेळसांड लक्षात घेऊन होळ या मध्यवर्ती ठिकाणी सन 1963 साली शाळेची स्थापना केली.

होळ गावातील जुन्या महादेवाच्या मंदिरावरून शाळेचे नाव श्री होळेश्वर विद्यालय असे ठेवण्यात आले. सुरूवातीच्या काळात शाळा गावातील चावडीवर तसेच गोसाव्याच्या मठात भरत असे. पुढे संस्थेने गावाच्या पूर्वेला असलेल्या श्री होळेश्वर महादेव मंदिराजवळील जागा विकत घेतली. जागा मिळाली, पण इमारत बांधण्यासाठी निधी नव्हता.

सन 1972 च्या दुष्काळात परिसरात तळ्याची कामे सुरू होती. गावकऱ्यांच्या विनंतीवरून गुत्तेदार श्री मुंडे यांनी शाळेच्या चार खोल्यांचे — एक कार्यालय व तीन वर्गखोल्यांचे — बेसमेंट तयार करून दिले. बांधकामासाठी निधी उभारायला तत्कालीन मुख्याध्यापक श्री काकडे सर व त्यांच्या शिक्षक सहकाऱ्यांनी स्वयंलिखित नाटकं केली — "ऊसाला लागल कोल्हा" व "गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं" — जी परिसरातील गावोगावी सादर करून निधी जमवला गेला व सुरुवातीच्या चार खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले.

पत्रे बसवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एल.आय.सी. एजन्ट श्री जोशी यांच्याकडे प्रत्येकी 10 हजारची इन्शुरन्स पॉलिसी काढली, आणि त्यांनीच शाळेसाठी पत्रे मिळवून दिले. कर्मचाऱ्यांच्या या समर्पणामुळे विद्यार्थीसंख्या वाढतच गेली. वर्गखोल्या अपुऱ्या पडू लागल्यावर, उसाचा पाला, चिंचेच्या फांद्या व शेवऱ्यांपासून विद्यार्थी, शेतकरी व पालकांच्या मदतीने एक तात्पुरती वर्गखोली उभारण्यात आली. शिक्षणाधिकारी श्री चांदेकर यांनी पाहणीसाठी भेट दिली असता, विद्यार्थीसंख्या व मुलांची शिकण्याची जिद्द पाहून ते प्रभावित झाले आणि त्यांनी शाळेसाठी विशेष अनुदान जाहीर केले, ज्यामुळे पुढील बांधकामाचा मार्ग मोकळा झाला. दगड खाणीतून दगड आणणे व घडवणे, तसेच शेतकऱ्यांच्या बैलगाडीने पांढरी माती आणणे — हे सर्व कामे शाळेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः केले. रात्रंदिवस अथक परिश्रम घेऊन त्यांनी एक नामवंत संस्था — श्री होळेश्वर विद्यालय — उभी केली.

स्थापनेपासून साधारण 10 ते 12 वर्षांनी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झाल्यावर, जवळपासच्या गावांसोबतच विविध तालुक्यांतील दूरदूरच्या खेड्यांतूनही विद्यार्थी येथे शिकण्यासाठी उत्सुक होऊ लागले. मात्र वसतीगृहाची सुविधा नसल्याने, कर्मचाऱ्यांनी स्वतःच पुढाकार घेतला — 'दादां'च्या परवानगीने स्वतःच्या पगारातील 4-5% वर्गणी करून वसतीगृह सुरू केले. विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद पाहून दादांनी दि. 29 मार्च 1997 रोजी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची अधिकृत मान्यता मिळवली.

सुरुवातीला वसतीगृहात 20 ते 30 विद्यार्थी राहत असत. पुढे बीड येथील समाज कल्याण कार्यालयाने एकूण 72 विद्यार्थ्यांच्या क्षमतेला मान्यता दिली. त्यानंतर दोन स्वतंत्र वसतीगृहे कार्यरत झाली — एक संस्थेमार्फत चालवले जाणारे, तर दुसरे समाज कल्याण विभागामार्फत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाला "साने गुरुजी वसतीगृह" असे नाव देण्यात आले. कालांतराने वसतीगृहात दरवर्षी 300–350 विद्यार्थी निवास करू लागले. आजवर जवळपास 3,000 विद्यार्थी येथे राहून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून गेले आहेत. सध्या नव्याने बांधलेल्या चार खोल्यांच्या वसतीगृह इमारतीत विद्यार्थ्यांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वसतीगृह आजही 'दादां'नी घालून दिलेली शिस्त कसोशीने पाळत कार्यरत आहे.

वसतीगृहातील सुविधा

💧 गाळलेले स्वच्छ पिण्याचे पाणी
💡 24 तास वीज व प्रत्येक खोलीत पंखे
📹 CCTV यंत्रणा
🛁 स्वतंत्र स्नानगृहे
🏟️ उत्तम क्रीडांगण
🍽️ नाश्ता + 2 वेळचे जेवण
🛏️ कॉट व गादीची व्यवस्था
📐 72 Seats (समाजकल्याण मान्यता)

विद्यार्थी येथून येतात: माजलगाव, परळी, केज, सोनपेठ, तेलगांव, वडवणी, दिंद्रुड, धारुर तसेच अंबेजोगाई तालुक्यातील खेडेगावांतून — उसतोड कामगार, रोजंदारी करणारे, डोंगराळ भागातील विद्यार्थी.

जवळपासचे लोक म्हणतात — "अकबराच्या दरबारात जसे नऊ रत्न होते तसे श्री म. वि. काकडे गुरुजी जेव्हा मुख्याध्यापक होते तेव्हा होळेश्वर शाळेमध्येही नऊ रत्न होते."

या पहिल्या पिढीतील शिक्षकांनी शाळेच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावली — ऊसाचा पाला व धाटे गोळा करून बांधणे, बांधकामासाठी बैलगाडीने पांढरी माती व दगड वाहून नेणे, इथपासून ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत पोषक वातावरण निर्माण करण्यापर्यंत — आदरणीय नारायण दादांच्या अखंड पाठबळावर विश्वास ठेवत त्यांनी रात्रंदिवस अथक परिश्रम घेतले.

स्थापनेपासून आजपर्यंत श्री होळेश्वर विद्यालयात पन्नासहून अधिक शिक्षकांनी सेवा बजावली आहे. आजमितीला शाळेमध्ये एकूण 16 शिक्षक-शिक्षिका कार्यरत आहेत, प्रत्येक आपापल्या विषयात तज्ज्ञ. चित्रकला, संगीत, तसेच शारीरिक शिक्षण यांकरीता विशेष शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. सुरुवातीपासून कोणतेही डोनेशन न घेता, नियमानुसार औपचारिक मुलाखतीद्वारे केवळ गुणवत्तेवर भरती — हे धोरण आजही कायम आहे. येथील प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःच्या कर्तृत्वावर आपले स्थान मिळवले असल्याने, प्रत्येकजण ही संस्था व शाळा स्वतःची मानून काम करतो.

स्पर्धा परीक्षा, शालेय स्तरावरील चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्तकला, शिल्पकला व सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी विद्यार्थ्यांना शिक्षक बारकाईने तयार करतात. इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय, NMMS, NTS तसेच शिष्यवृत्ती परीक्षांचीही सर्वंकष तयारी करून घेतली जाते. शासनामार्फत आयोजित सर्व प्रशिक्षण कार्यक्रम व विज्ञान प्रदर्शनांसारख्या उपक्रमांत येथील शिक्षक सक्रिय सहभाग घेतात.

🏆 Science Excellence

विज्ञान विषयाचे श्री राठोड ए. डी. यांनी सलग 5 वेळा जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात शाळेला प्रथम क्रमांक मिळवून दिला. IISER पुणे येथे प्रशिक्षणानंतर त्यांनी 100+ संकल्पना स्पष्ट करणारी स्वतःची प्रयोगपेटी तयार केली — संपूर्ण पश्चिम भारतातून निवड झाली.

🇬🇧 British Council Recognition

इंग्रजी विषयाचे श्री शिंदे पी. आर. यांनी सतत 2 वर्षे ब्रिटीश इंडिया काउन्सीलच्या प्रशिक्षण शिबीरात जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले.

स्थापनेपासूनच श्री होळेश्वर विद्यालयाला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आजही मोठ्या उत्साहात साजरे होतात, आणि विद्यार्थ्यांचे वक्तृत्व कौशल्य फुलवण्यासाठी अशा कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांचेही आयोजन केले जाते. 15 ऑगस्ट व 26 जानेवारीसारख्या राष्ट्रीय सणांना जनजागृतीसाठी प्रभात फेरी व पथनाट्ये सादर केली जातात.

🤸 मल्लखांब
🤼 कुस्ती — राज्यस्तरीय विजेते
🏏 कबड्डी, खो-खो — विभागीय स्तर
🏐 क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन
♟️ बुद्धिबळ (Chess)
🧘 योग दिन (Annual Yoga Day)
🎭 स्नेहसंमेलन · लोककला · नाटिका
📜 मराठी भाषा दिन · कवितावाचन

🏆 Wrestling Champions

चि. राहुल आबासाहेब शिंदे, चि. राहुल हनुमंत शिंदे, कु. ऋतुजा हनुमंत शिंदे — या विद्यार्थ्यांनी कुस्तीमध्ये शाळेचे व गावाचे नाव राज्यात गाजवले.

श्री अंकुशराव रामराव शिंदे
सेवानिवृत्त, पोलिस आयुक्त
श्री आण्णासाहेब मारुतीराव शिंदे
सेवानिवृत्त जिल्हाधिकारी
श्री गुलाबराव रानोबा सरवदे
सेवानिवृत्त लेखापरीक्षक
श्री दिपक ज्ञानोबा शिंदे
माजी पोलिस उपाधीक्षक
डॉ. श्री नवनाथ बळीराम घुगे
हृदयरोग तज्ञ, अंबाजोगाई
श्री ज्ञानोबा विठ्ठल सरवदे
माजी प्राचार्य, टि.सी. कॉलेज बारामती
श्री शाम नरहरी मुळभिले
आयात-निर्यात उद्योजक, मुंबई
श्रीमती लता धोंडीराम भेंडेकर
महिला व बाल कल्याण पर्यवेक्षक, मंत्रालय मुंबई
श्रीमती मीरा भानुदास लाड
सहाय्यक पोलिस निरीक्षक, रायगड
श्री दिपक घुगे
अस्थिरोग तज्ञ, AIIMS भुवनेश्वर, ओरिसा
श्री आकाश दत्तात्रय राठोड
सहाय्यक पोलिस निरीक्षक, मुंबई

श्री होळेश्वर विद्यालय, होळ ही शाळा केज व अंबाजोगाई या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 548 D ला लागून, केज व अंबाजोगाईच्या बरोबर मध्यभागी वसलेली आहे. श्री बनेश्वर शिक्षण संस्थेच्या मालकीचे शाळेचे एकूण क्षेत्रफळ 1 हेक्टर 26 आर (साधारण 3 एकर 11 आर) एवढे आहे — होळ गावातील सर्व्हे क्रमांक 123/K/6, 123/G/7, 124/8, 124/K/6, 124/G/7, 125/2/4 व 125/U/3 या भूखंडांत विस्तारलेले.

या एकूण क्षेत्रफळापैकी शाळा व वसतीगृह इमारतींनी 2,197.34 चौ. मी. जागा व्यापली आहे. यापैकी 480.77 चौ. मी. जागा पूर्णपणे आर.सी.सी. बांधकामाची असून, तिच्यात दोन कार्यालये, पुरुष व महिला शिक्षकांसाठी स्वतंत्र खोल्या, प्रयोगशाळा व ग्रंथालय यांचा समावेश आहे. उर्वरित 1,716.56 चौ. मी. जागा पत्र्याच्या छताची असून, त्यात 18 वर्गखोल्या, दोन संगणक कक्ष, क्रीडा विभाग, सांस्कृतिक व्यासपीठ आणि मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत. वसतीगृह इमारतीत चार आर.सी.सी. खोल्या असून, स्वयंपाकघर — दोन खोल्या, धान्यकोठार व अधीक्षक कार्यालयासह — पत्र्याच्या छताखाली आहे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ समोरील बाजूस एक दगडी संरक्षक भिंत उभी आहे. इमारतींव्यतिरिक्त परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली असून, एक परसबाग व विविध मैदानी खेळांसाठी उपयुक्त असे प्रशस्त क्रीडांगणही येथे आहे.

पूज्य वैद्य. नारायण दादा यांनी विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देण्याचे धोरण आणि शिक्षक भरतीत कोणतेही डोनेशन न घेण्याचा आग्रह ठेवल्यामुळे भौतिक सुविधांसाठी मर्यादित निधी उपलब्ध राहिला.

Current Needs — Help Us Grow

  • चारी बाजूंनी संरक्षण भिंत
  • वर्ग खोल्यांवर RCC चे छत
  • जुन्या शाहबादी फर्शीचे नूतनीकरण
  • जुन्या दगडी भिंतींची पुनर्बांधणी
  • मोठे सभागृह, सुसज्ज प्रसाधनगृह
  • वसतीगृहाच्या सुसज्ज खोल्या व स्वयंपाकगृह
  • Computer lab upgrade · Digital classrooms
Contribute / Contact Us →
Enquire About Admission →
← View All Schools